बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांवर सखोल चर्चा; ७७ विषयांना मंजुरी


बारामती दि.२६

संपादक – अनिकेत कांबळे 

नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी शरदचंद्रजी पवार सभागृहात नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

 

तब्बल सात ते आठ तास चाललेल्या या सभेत शहराच्या विकासाशी संबंधित सुमारे ७७ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक महत्त्वाच्या विकासकामांना सभेने मंजुरी दिली.

सभेच्या प्रारंभी दि. १२ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावर नगरसेवकांनी आक्षेप घेत मोठ्या प्रमाणात दुरुस्त्या सुचवल्या.

 

नागरिकांच्या प्रश्नांशी संबंधित अनेक मुद्दे इतिवृत्तामध्ये समाविष्ट न केल्याने सभागृहात वादाचे वातावरण निर्माण झाले. भविष्यात अशा चुका होऊ नयेत, यासाठी २४ नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे निवेदन नगराध्यक्षांकडे सादर करण्यात आले.

 

अजितदादा पवार स्मारकाचा प्रस्ताव चर्चेत

विषय क्रमांक ३ अंतर्गत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या भव्य स्मारकाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. सेंट्रल बिल्डिंगलगतच्या शासकीय जागेवर सुमारे साडेतीन एकर क्षेत्रात हे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या भेटवस्तूंचे संग्रहालयही उभारण्यात यावे, अशी भावना नगरसेवक अभिजीत चव्हाण यांनी व्यक्त केली.

विषय क्रमांक 9 आणि 10 वरती बोलताना नगरसेवक अभिजीत चव्हाण बिरजू मांढरे यांनी या विषयावर बोलताना, “हा विषय सर्व नगरसेवकांच्या जिव्हाळ्याचा व भावनिक आहे. प्रशासनाने सर्व तांत्रिक बाबी, आवश्यक मान्यता, एफएसआय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच हा प्रकल्प राबवावा,” असे मत व्यक्त केले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील अतिक्रमणाचा मुद्दा तापला

विषय क्रमांक २३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील कथित अतिक्रमणाचा विषय चर्चेत आला. नगरसेविका आरती शेंडगे-गव्हाळे यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना नगरसेवक बिरजू मांढरे यांनी संबंधित काम सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि मान्यता घेऊनच करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

या विषयावर सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर नगरसेवक अभिजीत चव्हाण, अभिजीत जाधव आणि जय पाटील यांनी मध्यस्थी करत मार्ग काढला.

 

नगराध्यक्षांनी या विषयासाठी पाच सदस्यीय समिती नेमून निर्णय घेण्याचे जाहीर केले.

 

४० नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांना मंजुरी

सभेत विविध प्रभागांतील विकासकामांबाबतचे प्रस्ताव मांडण्यात आले. तब्बल ४० नगरसेवकांनी सादर केलेल्या विकासकामांच्या प्रस्तावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

 

ग्रीन यात्रा संस्थेच्या उद्यान प्रकल्पात बदल

विषय क्रमांक १२ अंतर्गत ग्रीन यात्रा संस्थेमार्फत तीन उद्यानांच्या विकासाचा विषय चर्चेला आला. कसबा येथे भाडेतत्त्वावर जागा घेण्याचा प्रस्ताव असताना नगरसेवक जय पाटील यांनी तांदुळवाडी येथील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर उद्यान विकसित करण्याचा पर्याय सुचविला. या प्रस्तावाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.

 

घनकचरा व्यवस्थापन आणि स्टेडियम निविदांवर निर्णय

 

विषय क्रमांक ४३ मध्ये अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. मात्र संबंधित एनडीके संस्थेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव नगरसेवकांनी फेटाळून लावत तीन महिन्यांच्या आत नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी केली.

 

विषय क्रमांक ४४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या देखभाल व दुरुस्तीच्या निविदांबाबत चर्चा झाली. पूर्वीची संस्था बदलून नव्याने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

स्वीकृत सदस्य आणि नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद

सभेदरम्यान स्वीकृत सदस्य आणि निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये काही विषयांवरून शाब्दिक वाद निर्माण झाला. प्रभागातील कामांबाबत स्वीकृत सदस्यांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण तापले. गटनेते संजय संघवी हे स्वीकृत नगरसेवक गजाकस यांना समजून सांगत असताना स्वीकृत सदस्य हे आक्रमक झाले आणि तुम्ही गटनेते असाल पक्षाच्या सभागृहाचे इथले नाही .आणि एकेरी वक्तव्य केल्याने झालेल्या वादानंतर बल्लाळ ,धुमाळ, सोनवणे ,आदी नगरसेवकांनी निषेध नोंदविला. स्वीकृत सदस्यांनी सभागृहामध्ये शिस्तीचे पालन करावं कोणीही नगरपालिकेच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करू नये जेणेकरून वाद होतील आम्ही देखील स्वीकृत सदस्य होतो परंतु आम्ही काम करत असताना संबंधित नगरसेवकांना विचारूनच काम करत असायचो असे अमर धुमाळ यांनी सांगितले अखेर संबंधित स्वीकृत सदस्यांनी सभागृहाची आणि गटनेत्यांची जाहीर माफी मागितली. शब्द माघारी घेतले

यावेळी नगरसेवक अभिजीत चव्हाण यांनी, “स्वीकृत सदस्य हे आमचे सहकारी आहेत. मात्र प्रभागातील कामांबाबत स्थानिक नगरसेवकांशी चर्चा करूनच भूमिका घ्यावी. त्यांनी बारामतीच्या व्यापक विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे,” असे मत व्यक्त केले. त्यांच्या या भूमिकेला सर्व नगरसेवकांनी दुजोरा दिला.

 

अनेक नगरसेवकांचा सक्रिय सहभाग

सभेत ज्येष्ठ नगरसेवक सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर, अभिजीत जाधव, निलेश इंगोले, प्रसाद खारतोडे, किशोर मासाळ, संजय संघवी, यशपाल पोटे, अविनाश निकाळजे, प्रवीण माने यांच्यासह महिला नगरसेविका मनीषा चव्हाण, अनुप्रिता ताबे, रूपाली मलगुंडे, संपदा चौधर, वनिता सातकर, धनश्री बांदल, भारती शेळके, पुनम चव्हाण, मनीषा बनकर, सविता जाधव, सारिका वाघमारे आणि संघमित्रा चौधरी यांनी विविध विषयांवर सक्रिय सहभाग नोंदवत प्रशासनाला नागरिकांच्या हिताचे प्रश्न विचारले.

 

सात ते आठ तास चाललेल्या या सभेत बारामती शहराच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याने सर्वच नगरसेवकांनी सभेला उपस्थिती लावली आणि विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा घडून आली.


13
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!