ज्या गुन्ह्याचा पहिला साक्षीदार तू स्वतःच आहेस, त्या गुन्ह्यात काय शिक्षा द्यावी, ते तूच सांग” असा थेट सवाल न्यायाधीशांनी आरोपीला करताच न्यायालयात काही क्षण शांतता पसरली होती.
पुणे : (दि.२५) भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या केल्याप्रकरणी दोषी सिद्ध झाल्यानंतर भीमराव कांबळे याला २९ जून रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. भीमरावला कृत्याचा अजिबात पश्चाताप नसल्याने तो दयेच्या लायकीचा नाही, असा युक्तिवाद करत सरकारी वकिलांनी मृत्युदंडाच्या शिक्षेची मागणी केली होती. काय शिक्षा द्यायची तूच सांग, या न्यायमूर्तींच्या सवालाने कोर्टात शांतता पसरली. या प्रकरणात कोर्टाने शिक्षेची सुनावणी २९ जून रोजी करणार असल्याचं सांगितलं.
कोर्ट काय म्हणालं?
“ही घटना समाजासाठी घातक असं सरकारी पक्षाला वाटतं. दुर्दैवी मुलीवर झालेले अत्याचार हे परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांमुळे कोर्टात सिद्ध झाले. आरोपीचा इतिहास पाहता तो सुधारु शकत नाही, असं सरकारी पक्षाला वाटतं. तर घटनांची संगती लागत नसल्याचा बचाव पक्षाचा दावा आहे. घटनेमुळे आरोपी धक्क्यात गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आरोपी वृद्ध असल्याने तो इतका क्रूर गुन्हा करु शकतो का, असा प्रश्नही बचाव पक्षाला पडला आहे.” असं कोर्ट म्हणालं.
“आरोपीला सात मुलं आणि पत्नी आहेत, मात्र त्याला वाचवायला कोणीही आलं नाही. समाजाने आरोपीचं अस्तित्व नाकारलं आहे. फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेल्या दोन गुन्ह्यात तो दोषी आहे” अशा शब्दात कोर्टाने मृत्युदंडाच्या शिक्षेचे संकेत दिले होते.
शिक्षेबाबत न्यायाधीशांचा आरोपीलाच सवाल
“ज्या गुन्ह्याचा पहिला साक्षीदार तू स्वतः आहेस, त्या गुन्ह्याला काय शिक्षा द्यावी, ते तूच सांग,” असा थेट सवाल न्यायाधीशांनी आरोपीला करताच न्यायालयात काही क्षण शांतता पसरली. त्यापूर्वी न्यायालयाने आरोपीविरुद्धचे गुन्हे सिद्ध झाल्याचे स्पष्ट करत संबंधित कलमांनुसार होऊ शकणाऱ्या शिक्षेची माहिती दिली आणि त्यानंतर आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा हा प्रश्न विचारला.
न्यायालयात अत्यंत गंभीर वातावरण होते. शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायाधीशांनी आरोपीला त्याचे नाव विचारले. त्यानंतर त्याच्याविरुद्धचे आरोप आणि न्यायालयाने शाबित मानलेले गुन्हे स्पष्ट केले. संबंधित गुन्ह्यांसाठी कायद्यात कोणत्या शिक्षेची तरतूद आहे, याचीही माहिती आरोपीला देण्यात आली.
कोर्टात शांतता पसरली
यावेळी न्यायाधीशांनी आरोपीला स्मृतीला ताण देत घडलेल्या घटनेचा विचार करण्यास सांगितले. “त्या दिवशी नेमके काय घडले, याचा विचार कर. त्या गुन्ह्याचा पहिला साक्षीदार तू स्वतः आहेस. अशा गुन्ह्याला काय शिक्षा द्यावी, ते तूच सांग,” असा प्रश्न न्यायालयाने विचारला. या प्रश्नानंतर काही काळ न्यायालयात शांतता पसरली.
या संवादामुळे शिक्षा सुनावणीच्या प्रक्रियेला वेगळे परिमाण लाभल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात होती. आरोपीला स्वतःच्या कृत्याचे गांभीर्य समजावे आणि त्याने आत्मपरीक्षण करावे, या उद्देशाने न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केल्याचे उपस्थितांनी नमूद केले. त्यानंतर न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि कायदेशीर तरतुदींचा विचार करून शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय नोंदविला.
एका आरोपात फाशीची, तर दुसऱ्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. तर तिसऱ्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची तरतूद आहे, असं कोर्टाने स्पष्ट केलं.
भीमरावचा बनाव
मी त्या मुलीला गाठीशेव खायला नेत होतो, तेव्हा पाय घसरुन पडलो, त्यामुळे त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. ती जोरात रडायला लागली. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो, असा बनाव भीमराव करतानाच कोर्टाने म्हटलं की, तू जो सांगतोयस तो इतिहास झाला. कारण तुझ्यावरील गुन्हे आधीच सिद्ध झाले आहेत. त्यावर भीमराव निरुत्तर झाला.







