बारामती : (दि.२७)एमआयडीसी परिसरातील फेरेरो चॉकलेट कंपनीजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन महिला कामगारांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे बारामती एमआयडीसी परिसरासह राजाळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात संगीता लोंढे (वय ३३) आणि मनीषा शिंदे (वय ४३) यांचा मृत्यू झाला असून दोघीही राजाळे, ता. फलटण, जि. सातारा येथील रहिवासी होत्या. त्या बारामती एमआयडीसी परिसरातील ड्रीम प्लास्ट कंपनीमध्ये कामगार म्हणून कार्यरत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, फेरेरो चॉकलेट कंपनीजवळ त्यांच्या दुचाकीला कारची जोरदार धडक बसली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने दुचाकीवरील दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना दोघींचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर काही काळ परिसरात मोठी गर्दी झाली होती. संबंधित पोलीस यंत्रणेकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, अपघात नेमका कसा घडला आणि त्यास कोण जबाबदार आहे, याचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, एकाच अपघातात दोन महिला कामगारांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राजाळे गावासह बारामती एमआयडीसी परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.








