श्री काशीविश्वेश्वर तरुण मंडळ, कसबा – बारामती
संपादक – अनिकेत कांबळे
दहीहंडी सरावाचा नारळ संपन्न; यंदाचा उत्सव स्व. अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित
बारामती, दि. २५ ऑगस्ट २०२६ :
सालाबादप्रमाणे ७५ वर्षांची गौरवशाली परंपरा जपत श्री काशीविश्वेश्वर तरुण मंडळ, कसबा–बारामती यांच्या दहीहंडी सरावाचा नारळ प्रथेनुसार नागपंचमीच्या मुहूर्तावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत असतो , मात्र यंदा आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे सरावाचा शुभारंभ अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरज सातव, मार्गदर्शक श्री. सदाशिव बापुजी सातव व श्री. दत्तात्रय काकाजी सातव, तसेच मंडळाचे आधारस्तंभ व बारामती नगरीचे नगराध्यक्ष श्री. सचिन सातव यांच्या उपस्थितीत मंडळाच्या वतीने आपले लाडके नेते स्व. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर परंपरेनुसार भगवान श्रीकृष्णाची विधिवत पूजा करून दहीहंडी सरावाच्या नारळाचा कार्यक्रम पार पडला.
गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून मंडळाच्या कार्याचे कौतुक तसेच मार्गदर्शन करणारे, अखंड बारामतीकरांचा श्वास असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत, ही संपूर्ण बारामतीकरांसाठी अत्यंत दुःखद व मनाला चटका लावणारी बाब आहे.
स्व. अजितदादांचे मंडळाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, त्यांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन आणि मार्गदर्शन यांची आठवण आजही मंडळाच्या प्रत्येक पदाधिकारी व सदस्याच्या मनात कायम आहे.
या पार्श्वभूमीवर मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, सभासद, ज्येष्ठ नेते मंडळी व सहकाऱ्यांच्या विचारविनिमयानंतर, यावर्षी श्री काशीविश्वेश्वर तरुण मंडळातर्फे कोणताही उत्सव अथवा आनंदोत्सवाचा कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
दहीहंडी उत्सवाची ७५ वर्षांची गौरवशाली परंपरा जपत असतानाच, यावर्षी आनंदोत्सवापेक्षा आपल्या लाडक्या नेत्याच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करणे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणे याला मंडळाने प्राधान्य दिले आहे.
“दादा, आपण आज आमच्यात नसलात तरी आपल्या आठवणी, आपले मार्गदर्शन आणि बारामतीच्या विकासासाठी केलेले कार्य आमच्या सदैव स्मरणात राहील.”
सदैव स्मरणात… आदरणीय दादा…
स्व. अजितदादांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!
– अध्यक्ष, सर्व आजी-माजी पदाधिकारी व सदस्य
श्री काशीविश्वेश्वर तरुण मंडळ, कसबा – बारामती








