अजितदादांना अनोखी आदरांजली; ३० तासांच्या सलग सादरीकरणाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद..


*कृतीतून आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली*

(३० तासांचे सलग कौशल्य सादरीकरण; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

बारामती (दि.०९)

काऱ्हाटी: आदरणीय अजितदादांना एका वेगळ्या, कृतीप्रधान आणि भावपूर्ण पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था, काऱ्हाटी अंतर्गत आय.टी.आय. विभागाच्या वतीने दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी “कृतीतून श्रद्धांजली” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत आय.टी.आय. विभागातील एकूण १०० विद्यार्थी व १४ शिक्षक-कर्मचारी यांनी एकत्रित सहभाग नोंदवत “Longest Continuous Multi Trade Skill Demonstrations” या संकल्पनेअंतर्गत सलग दिवस-रात्र अशा तब्बल ३० तास विविध तांत्रिक कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. श्रद्धांजली ही केवळ शब्दांपुरती मर्यादित न राहता ती कृतीतून व्यक्त व्हावी, या भावनेतून विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण केले.

आदरणीय अजितदादांची कायम अशी भूमिका होती की, राज्यातील युवकांनी केवळ मूलभूत शिक्षणावर थांबून न राहता प्रत्यक्ष कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी व्हावे. कौशल्य विकासातून रोजगारनिर्मिती होते आणि सक्षम, आत्मनिर्भर समाज घडतो, ही त्यांची ठाम धारणा होती. त्याच विचारांना अनुसरून विद्यार्थ्यांनी सलग ३० तास अखंड परिश्रम करून विविध ट्रेडमधील कौशल्यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांची जिद्द, शिस्त, सातत्य आणि संघभावना हीच आदरणीय दादांच्या कौशल्य विकासाच्या ध्येयाला खरी मानवंदना ठरली.

विशेष म्हणजे, या उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून “Longest Continuous Multi Trade Skill Demonstrations” या संकल्पनेअंतर्गत केलेल्या या ३० तासांच्या सलग कौशल्य सादरीकरणाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेल्या या प्रयत्नाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

हा उपक्रम महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा अजित पवार, तसेच विश्वस्त कु. पार्थ अजित पवार (राज्यसभा खासदार, भारत सरकार) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला, अशी माहिती संस्थेचे सचिव श्री. प्रफुल्ल तावरे यांनी दिली.

या उपक्रमामध्ये स्वप्नील काळभोर, केतन तांबे, अश्विनी भिसे, अनुजा हाके, सायली एकतपुरे, विशाल मदने, बाबासाहेब खंडाळे, राजेंद्र मदने, अक्षय तावरे, राहुल जाधव, अभिजीत पवार, महेश गायकवाड, सुषमा जाधव व सोनाली जमदाडे या निदेशकांनी विद्यार्थ्यांसोबत सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच या उपक्रमासाठी निरीक्षक म्हणून महेश चांदगुडे व नवनाथ सिरसट यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण स्वप्निल धुमाळ व प्रतिक कांबळे यांनी केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कर्तव्यभावना आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाली असून कौशल्य विकासाच्या माध्यमातून समाजासाठी सकारात्मक प्रेरणा मिळाली असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री. विकास निर्मळ यांनी दिली.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!