कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था, काऱ्हाटी संकुलात ‘आरंभ… यशाचा प्रारंभबिंदू’ व्याख्यानमालेचे आयोजन


बारामती (दि.१८ जुलै )                               संपादक – अनिकेत कांबळे 

कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था, काऱ्हाटी यांच्या वतीने आयोजित *‘आरंभ… यशाचा प्रारंभबिंदू’* या प्रेरणादायी व्याख्यानमालेअंतर्गत *सातव्या पुष्पाचे* आयोजन उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून *प्रा. स्मिता सुरेश पाटील*, प्राचार्या, कृष्णाई एन. के. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कात्रज, ता. करमाळा, जि. सोलापूर यांनी *”मोठी स्वप्ने, योग्य सवयी आणि उज्ज्वल भविष्य”* या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

 

आपल्या व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस ठेवावे, त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी योग्य सवयी, वेळेचे नियोजन, सातत्य, शिस्त, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास जोपासणे किती आवश्यक आहे, याचे प्रभावी उदाहरणांसह विवेचन केले. *”यश ही एका दिवसाची घटना नसून, योग्य सवयींच्या सातत्यपूर्ण प्रवासाचे फलित असते,”* असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून संवाद साधला.

यावेळी *बारामतीची कन्या कु. श्रावणी कुदळे* हिने *राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET)* मध्ये भारतातील मुलींमध्ये अव्वल स्थान प्राप्त करून बारामतीसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल संस्थेच्या वतीने तिचा विशेष उल्लेख करण्यात आला. तसेच तिच्या या उल्लेखनीय यशामागील *आई-वडील तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन* करण्यात आले. कु. श्रावणी कुदळे हिच्या जिद्द, सातत्य, परिश्रम आणि ध्येयवेड्या वृत्तीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून संस्थेतील विद्यार्थिनींनीही मोठी स्वप्ने पाहत कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाच्या बळावर सर्वोच्च यश संपादन करावे, अशी प्रेरणादायी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

ही व्याख्यानमाला संस्थेच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री *मा. श्रीम. सुनेत्रा (वहिनीसाहेब) अजितदादा पवार* यांच्या प्रेरणेतून व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, करिअरविषयक दृष्टीकोन, जीवनमूल्यांची जपणूक आणि स्पर्धात्मक परीक्षांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा या व्याख्यानमालेचा प्रमुख उद्देश आहे.

 

कार्यक्रमाचे *प्रास्ताविक संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री. विकास निर्मळ* यांनी करून व्याख्यानमालेमागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन कु. कोमल चांदगुडे व श्री. अल्ताफ बागवान* यांनी केले, तर *आभार प्रदर्शन कु. प्रिती लोंढे* यांनी मानले. कार्यक्रमाचे *छायाचित्रण श्री. स्वप्नील धुमाळ* यांनी केले.

 

यावेळी संकुलातील *सर्व विभागांचे प्राचार्य, प्राचार्या, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.* संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देत ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आवश्यक असलेल्या योग्य सवयी, सातत्यपूर्ण परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा प्रभावी संदेश या व्याख्यानातून मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


16
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!