*बारामती हाय – टेक टेक्सटाइल पार्कमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त प्रेरणादायी उपक्रम*
*बारामती : (दि.०८)* बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्क लिमिटेड म्हटले की, अनेक कुटुंबांच्या स्वप्नांना आधार देणारे एक मोठे कुटुंब डोळ्यासमोर उभे राहते. आदरणीय उपमुख्यमंत्री *सुनेत्रा वहिनी पवार* यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे टेक्सटाइल पार्क हजारो महिलांच्या आयुष्याला दिशा देणारे ठरले आहे. याच कुटुंबात जागतिक महिला दिनानिमित्त शांततेत, साधेपणात पण अत्यंत अर्थपूर्ण अशा पद्धतीने महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारे विविध प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आले.
टेक्सटाइल पार्क परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने सामूहिक *स्वच्छता मोहीम* राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यानुसार सर्व कंपन्यांच्या बाहेरील परिसरात आठवड्यातून तीन वेळा – मंगळवार, शुक्रवार व रविवार – नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार. या उपक्रमात सर्व व्यवस्थापकसह कंपन्यांचा सक्रिय सहभाग घेतला.
याचबरोबर जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येक कंपनीमध्ये सर्व कर्मचारी एकत्र येऊन *पर्यावरण संवर्धनाची शपथ* घेतली. निसर्गाचे संरक्षण, पाणी व वीज बचत, प्लास्टिकचा वापर कमी करणे, तसेच वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. स्वच्छ, हिरवे आणि सुरक्षित पर्यावरण पुढील पिढ्यांसाठी जपण्याचा निर्धार या शपथेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.
तसेच *ICAR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट (NIASM)* यांच्या सहकार्याने अनुसूचित जातींसाठी विकासात्मक कृती आराखडा (Development Action Plan for Scheduled Caste) अंतर्गत गरजू महिलांना लाभ देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १०० पैकी २५ अनुसूचित जातींतील महिलांना विविध लाभ कीटचे वितरण करण्यात आले.
या लाभ कीटमध्ये *पाण्याची टाकी, मोटार, पाईप, ताडपत्री, घरगुती भांडी संच, डायनिंग कीट आदी वस्तूंचा समावेश* होता. या माध्यमातून ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि आत्मविश्वास हा या उपक्रमाचा खरा यशस्वी परिणाम ठरला.
यावेळी बोलताना *डॉ. ए. के. सिंह आणि डॉ. महेश* यांनी सांगितले की, आज महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे पुढे येत आहेत. समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांना संधी व प्रोत्साहन मिळाल्यास त्या समाजात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात.
*डॉ. नितीन कुराडे* यांनी सांगितले की टेक्सटाइल पार्कचे कार्य हे शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेले आहे. त्यामुळे अनुसूचित जातींतील २५ गरजू महिलांना लाभ कीट देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यावेळी *सौ. वृषाली तावरे,* उपनगराध्यक्षा माळेगाव नगर पंचायत यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की प्रत्येक यशस्वी कुटुंबाच्या पाठीशी महिला खंबीरपणे उभी असते. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांचे योगदान मोलाचे असून त्यांना शिक्षण, प्रशिक्षण व प्रेरणा देण्यासाठी संस्था पुढे येणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमास सौ. वृषाली तावरे, डॉ. ए. के. सिंह, डॉ. नितीन कुराडे, डॉ. महेश, श्री. सुनील पाटील, श्री. विजय कोकाटे, सौ. वृषाली सावंत, श्री. सुधीर तसेच टेक्सटाइल पार्कमधील महिला कर्मचारी उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम घडवत *बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्कमध्ये जागतिक महिला दिन प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी वातावरणात साजरा* करण्यात आला.









