आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात 16 ऑगस्टला बारामतीत विराट महामोर्चा.


संपादक – अनिकेत कांबळे

बारामती (दि.१५): अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात बारामती शहर व तालुक्यातील 59 अनुसूचित जाती घटकांच्या वतीने रविवार, 16 ऑगस्ट 2026 रोजी विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात 14 ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बैठक पार पडली.

या बैठकीस 59 अनुसूचित जाती घटकांतील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. बैठकीमध्ये मोर्चाची रूपरेषा, प्रमुख मागण्या, मोर्चातील सहभाग तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

रविवारी सकाळी 11 वाजता सिद्धार्थनगर बुद्धविहार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक, मेन सिनेमा रोड मार्गे नगर परिषदेसमोर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानविरोधी उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात तातडीने विशेष अधिवेशन बोलावून दुरुस्ती करावी, न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा, तसेच शासकीय सेवेमधील अनुसूचित जातींच्या रिक्त पदांची विशेष भरतीद्वारे तातडीने भरती करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.

तसेच अनुसूचित जातींसाठी पदोन्नतीतील आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि देशभर जातीनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, या मागण्याही मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत.

दरम्यान, “एकच निर्धार, आरक्षण  वाचवू!” आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजन अनुसूचित जाती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या मोर्चात बारामती शहर व तालुक्यातील अनुसूचित जातींच्या सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा  समिती, बारामती यांच्या वतीने करण्यात आले आहे


18
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!