बारामतीत बेकायदेशीर बॅनर, स्टेडियम प्रकरण व अनधिकृत भंगार व्यवसायाविरोधात 26 जानेवारी रोजी आंदोलन केले.
दि.(26जाने) बारामती | प्रतिनिधी
बारामती शहरात बेकायदेशीरपणे लावण्यात आलेले फ्लेक्स, बॅनर, अनधिकृत जाहिराती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या वापराबाबत झालेली आर्थिक थकबाकी तसेच शहर व परिसरातील अनधिकृत भंगार व्यवसायामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला निर्माण झालेल्या धोक्याविरोधात दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी बारामती नगरपरिषद कार्यालयासमोर सकाळी तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात
आंदोलनकर्ते विनय विजय दामोदरें यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील कासारी सर्कल, गुनवडी चौक, इंदापूर चौक, भिगवण चौक आदी ठिकाणी सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पॅनलकडून बेकायदेशीररीत्या लावण्यात आलेल्या फ्लेक्स व बॅनरवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. याबाबत दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
तसेच बारामती नगरपरिषदेच्या मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा वापर करणाऱ्या डी.जे. क्रिकेट अकॅडमीकडे सुमारे 13 लाख 29 हजार 596 रुपयांची थकबाकी असूनही आजपर्यंत कोणतीही वसुली किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
याशिवाय शहर व परिसरात अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या भंगार व्यवसायामुळे आग लागण्याचे व अपघाताचे प्रकार वारंवार घडत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे नमूद करत, संबंधित व्यावसायिकांविरोधात तातडीने कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे.
या सर्व प्रकरणांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
या आंदोलनात मंगलदास निकाळजे , सागर गवळी, अक्षय गायकवाड , महेश बगाडे, दयावान दामोदरे, श्रीपाद सोनवणे, आनंद जाधव, आकाश दामोदरे, पप्पू माने आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते









