अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. विमान कोसळताच त्याने काही सेकंदातच भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि जळून खाक झाले. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागले. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांचे सुरक्षारक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे. अजित पवार आज बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार महत्त्वाच्या सभांना संबोधित करणार होते, मात्र त्यापूर्वीच हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.









