दौंड, प्रतिनिधी (दि.१८): दौंड शहर व औद्योगिक परिसरात मोठी खळबळ उडवणाऱ्या एका गंभीर प्रकरणात दौंड पोलीस ठाण्यात संदीप पोपट भागवत कुरकुंभ तालुका दौंड यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२) तसेच ३(५) अन्वये हा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी चांगदेव सावता बनकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी संदीप भागवत यांनी दिनांक १६ जुलै २०२६ पासून वेळोवेळी तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच नंतर तडजोडीच्या नावाखाली ५ ते ६ लाख रुपयांची रक्कम देण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपीने प्रत्यक्ष भेटीगाठी तसेच दूरध्वनीवरून वारंवार पैशांची मागणी केली. ही मागणी केवळ आर्थिक लाभासाठी नसून स्वतःचा जप्त झालेला शस्त्र परवाना वाचवणे, फिर्यादीविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेला तक्रार अर्ज मागे घेणे आणि फिर्यादीच्या इमारत बांधकाम प्रकरणातील कारवाई थांबवणे या कारणांसाठी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर आरोपी एका मोठ्या राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याशी संबंधित असल्याची मोठी चर्चा परिसरात सुरू आहे.
या प्रकरणामुळे दौंड शहरासह औद्योगिक वसाहत परिसरात मोठी चर्चा रंगली असून, कायद्याचा धाक दाखवून अथवा दबाव निर्माण करून पैशांची मागणी केल्याचे आरोप अत्यंत गंभीर मानले जात आहेत. विशेष म्हणजे व्यवसाय व उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्तीवर अशा प्रकारे खंडणीची मागणी झाल्याचा आरोप समोर आल्याने व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, खंडणीसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलीस यंत्रणा तपासाला लागली असून, मोबाईल कॉल रेकॉर्ड, संबंधित कागदपत्रे, संभाषणे आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणामुळे दौंड तालुक्यात मोठी राजकीय, सामाजिक आणि कायदेशीर खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








