मुलींना मारहाण करण कोथरूड पोलिसांना भोवल.गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश…!


कोथरूड पोलिसांकडून मुलींना मारहाण प्रकरणी कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल मंगळवारी आलेला आहे. कोथरूड प्रकरणात जे जे पोलिस अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलेला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली हा तपास केला जावा, असे देखील सांगण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन पक्षाच्या वकिलांनी या संदर्भात पत्रकारांना दिली आहे.

ॲड अरविंद तायडे म्हणाले, जे पुरावे उपलब्ध आहेत त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही केली होती. त्यानुसार कोथरूड पोलिस ठाण्याचे तात्कालीन सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, कर्मचारी श्रुती कडणे, संभाजीनगर पोलिस स्टेशनचे अमोल कामटे आणि महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, पोलिस हवालदार विनोद परदेशी, सायबर पोलिस विभागाचे धनंजय सानप, छत्रपती संभाजीनगरचे माजी पोलिस अधिकारी सखाराम सानप, एक अन्य महिला यांच्यावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील चार पोलिसांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतले गेले. त्यानंतर त्यांना घेऊन जात जातीवाचक शिवीगाळ आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरून त्यांचा छळ केल्याचा प्रकार घडलेला होता.

याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. त्यामुळे याबाबत पीडित मुलींच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वकिलांनी न्यायालयात ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी केली होती. त्यावर न्यायाधिकारी एच.के.भालेराव यांच्या न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलेला आहे. अपहरण, विनयभंग, ॲट्रॉसिटीनुसार चार पोलिस अधिकारी यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. महिलांसोबत पोलिसांनी केलेले कृत्य हे घृणास्पद होते. न्याय मागताना मागील तीन महिने पोलिसांनी आम्हाला वाईट पद्धतीने वागणूक दिली असल्याचा आरोप करण्यात आला होता.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!