पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यातील बेपत्ता पोलीस नाईक निखिल रणदिवे अखेर सापडला आहे. शिक्रापूर येथील त्याच्या राहत्या घरी काल रात्री उशिरा तो स्वतःहून हजर झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
गेल्या पाच दिवसापासून निखिल रणदिवे हा बेपत्ता असलेला निखिल रणदिवे आता घरी परतला आहे. बेपत्ता होण्यापूर्वी त्याने पोलीस अधिकाऱ्यांना एक ईमेल द्वारे तक्रार पाठवली होती आणि या तक्रारी अर्जात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या वर्षभराच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.
5 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास निखिल रणदिवे हा शिक्रापूर येथील राहत्या घरातून निघून गेला होता. तत्पूर्वी 4 डिसेंबरला निखिल रणदिवे याने वरिष्ठ पोलीस अधिकारी बापूराव दडस यांना एक मेल केला होता. ज्या मेलमधून त्यांनी आपल्याला यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याकडून गेल्या वर्षभरापासून त्रास होत असल्याचे नमूद केला होतं. या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत आहोत असेही त्याने या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. एकूणच निखिल रणदिवे बेपत्ता झाल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली होती.
पाच डिसेंबर पासूनच निखिल रणदिवे यांच्या शोधासाठी चार पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी प्रसार माध्यमांना दिली होती. दरम्यान सहा डिसेंबर रोजी निखिल यांच्या पत्नी अक्षदा रणदिवे यांनी थेट यवत पोलीस ठाणे गाठत वरिष्ठ अधिकारी बापूराव दडस यांच्यासमोर आपली कैफियत मांडली होती. यावर पोलीस खात्यांना निखिल रणदिवे यांच्या कुटुंबीयांना आश्वासित केलं होतं की लवकरात लवकर आपण निखिल रणदिवे यांचा शोध घेऊ. दरम्यान काल रात्री उशिरा निखिल रणदिवे स्वतःहून शिक्रापूर येथील त्यांच्या राहत्या घरी हजर झाला आहे अशी माहिती पोलीस खात्याने दिली आहे.
पोलीस खात्याकडून आता निखिल रणदिवे याची चौकशी होणार आहे गेल्या पाच दिवसापासून तो कुठे होता ? या काळात निखिलच्या संपर्कात कोण होतं का ? शिवाय त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांची देखील चौकशी केली जाणार आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी दिली आहे.









