मा. सुनेत्रावहिनी पवार व मा. पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण युवक-युवतींसाठी नवा उपक्रम
काऱ्हाटी , ता. बारामती (दि.११): ग्रामीण भागातील युवक-युवतींना गुणवत्तापूर्ण भरतीपूर्व प्रशिक्षण उपलब्ध करून देत त्यांच्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित व्हावी, या व्यापक सामाजिक ध्येयातून कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था, काऱ्हाटी यांच्या वतीने *’अजित करिअर अकॅडमी’* ची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री दिवंगत मा. अजितदादा पवार साहेब यांनी पाहिलेल्या सक्षम, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष आणि शासकीय सेवेसाठी सज्ज ग्रामीण युवक घडविण्याच्या दूरदृष्टीला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था, काऱ्हाटी च्या अध्यक्षा मा. श्रीमती सुनेत्रावहिनीसाहेब अजितदादा पवार तसेच संस्थेचे विश्वस्त व राज्यसभा खासदार मा. श्री. पार्थदादा अजितदादा पवार यांच्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि संकल्पनेतून साकार झालेली ही अकॅडमी ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी शासकीय सेवेकडे वाटचाल करण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.
आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये क्षमता, जिद्द आणि गुणवत्ता असूनही योग्य मार्गदर्शन, नियोजनबद्ध प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक वातावरणाचा अभाव जाणवतो. ही उणीव दूर करण्याच्या उद्देशाने अकॅडमीमध्ये पोलीस भरती, सैन्य भरती, वनरक्षक भरती, राज्य उत्पादन शुल्क सिपाई भरती, कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission – SSC) अंतर्गत विविध भरती, तलाठी, ग्रामसेवक तसेच इतर विविध शासकीय भरती परीक्षांसाठी लेखी व मैदानी प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, शारीरिक तंदुरुस्ती, नियमित सराव परीक्षा (Mock Test), मुलाखत कौशल्य विकास आणि अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. आधुनिक प्रशिक्षण प्रणाली, गुणवत्तापूर्ण अध्यापन, शिस्तबद्ध वातावरण आणि विद्यार्थीकेंद्रित अभ्यासपद्धतीच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी करण्याचा संस्थेचा मानस आहे.
ही अकॅडमी केवळ भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र नसून, ग्रामीण युवक-युवतींमध्ये राष्ट्रसेवा, सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि शिस्त यांसारखी मूल्ये रुजविणारे व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे. गुणवत्तापूर्ण, जबाबदार आणि संवेदनशील शासकीय अधिकारी घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शासकीय सेवेतील यशस्वी कारकिर्दीसाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव श्री. प्रफुल्ल तावरे यांनी केले आहे.
याबाबतची माहिती संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री. विकास निर्मळ यांनी दिली.









