दोन कोटी ३५ लाखांचा गांजा जप्त; बारामती पोलिसांची ऐतिहासिक कारवाई..!


बारामती प्रतिनिधी : बारामती विभागात पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विशेष नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहिमेमुळे अंमली पदार्थांविरोधातील मोठी कारवाई उघडकीस आली असून तब्बल २ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा ४७० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या कडक कारवाईचा धाक बसल्याने आरोपींनी गांजाने भरलेले दोन मोठे ड्रम शेतात टाकून घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.

दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या नियंत्रणाखाली बारामती विभागात नाकाबंदी, रात्रगस्त, वाहन तपासणी व कागदपत्र पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान संशयित गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते.

पोलिसांच्या सातत्यपूर्ण दबावामुळे अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात वाहतूक करणारे आरोपी घाबरून गेले आणि मौजे जळोची येथील पिंपळी रोड परिसरातील शेताच्या मोकळ्या जागेत गांजाचे दोन ड्रम टाकून फरार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता ड्रममध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.

पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात एकूण ४७० किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे बाजारभावानुसार किंमत सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. बारामती विभागातील अंमली पदार्थांविरोधातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

प्राथमिक तपासानुसार होळी सणाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी हा गांजा बारामती परिसरात आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पोलिसांच्या प्रभावी नाकाबंदीमुळे आरोपींना माल टाकून पळ काढावा लागला.

या कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी व त्यांच्या पथकाने तत्परतेने कार्य करत मोठा अनर्थ टाळला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असून पोलीस दलाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. अंमली पदार्थांविरुद्धची मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून नागरिकांनी संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!