बारामती, दि.(१४ ऑगस्ट) : बारामती शहर व तालुका परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व बारामती तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका सराईत चोरट्यास अटक केली. आरोपीकडून सुमारे ३० लाख रुपये किमतीच्या १९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून १९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती परिसरात वाढलेल्या बुलेट व इतर दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास सुरू असताना गुप्त माहितीच्या आधारे संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याचे नाव समाधान बाळू काळे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे निष्पन्न झाले.

आरोपी रात्रीच्या वेळी दुचाकी चोरी करून त्या वाहनांवर महाराष्ट्र पोलीस, वनसेवा किंवा एसटी महामंडळाचे लोगो लावत असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करून वाहनांचा वापर करण्याचा त्याचा प्रयत्न होता.
या कारवाईत १३ बुलेट मोटारसायकलींसह इतर ६ दुचाकी असा एकूण १९ वाहनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे ३० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत.









