- बारामती (प्रतिनिधी): समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्य केल्याबद्दल
बारामतीचे सामाजिक कार्यकर्ते मा. मंगलदास निकाळजे यांना ‘ज्ञानमाता सेवाभावी संस्था, पुणे’ तर्फे राज्यस्तरीय सन्मानपत्र व पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुण्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा येथे दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित “माहितीचा अधिकार नागरिक समूह” च्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांना हा महत्त्वाचा सन्मान प्रदान करण्यात आला. माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून समाजातील अन्यायाविरोधात लढणे, तसेच शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, न्यायिक व पर्यावरणीय प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या या कार्यामुळे शासनामध्ये पारदर्शकता वाढण्यास मदत झाली असून, त्यांचा लढाऊ व सकारात्मक दृष्टिकोन इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरला आहे. ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आढाव व सचिव अमर कामठे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते मंगलदास निकाळजे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या भव्य कार्यक्रमास राज्यभरातील विविध सामाजिक, पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सन्मानामुळे बारामती आणि परिसरात समाधानाची व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. संस्थेच्यावतीने “आपण समाजसेवेचा हा प्रवास असाच पुढे चालू ठेवावा, हीच आमची मनःपूर्वक शुभेच्छा”, असा संदेश निकाळजे यांना देण्यात आला. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना समाजकार्यातील पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा मिळाली आहे.









