बारामती दि.23
*वादग्रस्त वक्तव्यावेळी गप्प, आता स्मारकासाठी पुढे का? – नवनाथ बल्लाळ यांचा नगरसेवकांवर निशाणा*
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारक उभारणीच्या विषयावर बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा रंगली असताना, या विषयावर बोलण्यासाठी आणि सूचक होण्यासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसून आले. मात्र याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ चे स्थानिक नगरसेवक तथा आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी काही नगरसेवकांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली.
बल्लाळ यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, अजितदादा पवार यांच्याविरोधात पूर्वी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. त्या वेळी अजितदादांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्यासाठी फार कमी जण पुढे आले होते. त्या प्रसंगी केवळ नगरसेवक अमर धुमाळ आणि विशाल हिंगणे यांनी भूमिका घेतली होती. मात्र आज स्मारकाच्या विषयावर पुढाकार घेण्यासाठी अनेक जण पुढे येत असल्याचे दिसत आहे.
यावेळी त्यांनी विरोधी पक्षातील नगरसेविका आरती शेडगे तसेच इतर नगरसेवकांनाही थेट प्रश्न विचारला. “जेव्हा अजितदादांबाबत वादग्रस्त वक्तव्य झाले होते, तेव्हा तुम्ही गप्प का बसला होतात? त्या वेळी त्यांचा सन्मान राखण्यासाठी आवाज का उठवला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्मारक उभारणीसाठी सूचक होण्याची स्पर्धा सुरू असताना, केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी काही जण पुढाकार घेत असल्याचा आरोपही बल्लाळ यांनी केला. अजितदादांप्रती खरी निष्ठा कृतीतून दिसली पाहिजे, केवळ सभागृहातील भाषणातून नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बल्लाळ यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात काही काळ वातावरण तापले. स्मारकाच्या विषयावरून सुरू झालेली चर्चा नंतर राजकीय भूमिकांवर आणि निष्ठेच्या प्रश्नांवर केंद्रित झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही चर्चेला उधाण आले असून, या विषयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.








