टी. सी. महाविद्यालयाचा सायबर सेक्युरिटी विभागाचा White Band Associates सोबत सामंजस्य करार..!


बारामती: (दि.२२)

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षणाची नवी संधी.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील करिअरच्या संधी ओळखून तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती यांनी बी.एस्सी. सायबर सेक्युरिटी अँड डिजिटल सायन्स हा नाविन्यपूर्ण पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. डिजिटल युगात सायबर सुरक्षा क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप आणि उद्योगाभिमुख कौशल्ये प्रदान करणार आहे.

 

हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम AEDP (Apprenticeship Embedded Degree Programme) अंतर्गत राबविण्यात येत असून, अंतिम सत्रामध्ये विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये ऑन-द-जॉब ट्रेनिंग (OJT) तसेच विद्यावेतन (Stipend) मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळून रोजगारक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे.

 

याच अनुषंगाने नाशिकस्थित White Band Associates या नामांकित कंपनीसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप, प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची संधी, उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात कुशल सायबर सुरक्षा व्यावसायिक घडविणे आणि विद्यार्थ्यांना स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी सक्षम बनविणे या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

या प्रसंगी White Band Associates तर्फे Founder & CEO ऍड. स्वरदा कबनुरकर, डायरेक्टर विनोद कबनुरकर, CLO स्वाती कबनुरकर उपस्थित होते. महाविद्यालयातर्फे प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्या प्रा. डॉ. योगिनी मुळे, उपप्राचार्य प्रा. डॉ. अरुण मगर, वाणिज्य शाखेचे अधीक्षक प्रा. डॉ. निरंजन शहा आणि सायबर सेक्युरिटी अँड डिजिटल सायन्स विभागाचे विभागप्रमुख प्रा. राहुल शहा उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश जगताप म्हणाले, *”राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या उद्दिष्टांनुसार उद्योग व शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करण्यासाठी असे सामंजस्य करार अत्यंत उपयुक्त आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष उद्योग अनुभव मिळणे ही काळाची गरज आहे.”*

 

White Band Associates च्या Founder & CEO ऍड. स्वरदा कबनुरकर यांनी सांगितले, *”सायबर सुरक्षा क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज आहे. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना उद्योगमान्य कौशल्ये आत्मसात करण्याची आणि करिअर घडविण्याची सुवर्णसंधी मिळेल.”*

 

विभागप्रमुख प्रा. राहुल शहा म्हणाले, *”सायबर सेक्युरिटी अँड डिजिटल सायन्स अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना रोजगार, अप्रेंटिसशिप, उद्योजकता आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम आहे. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणादरम्यानच उद्योगक्षेत्राशी जोडले जाण्याची संधी मिळणार आहे.”*

 

महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा क्षेत्रातील आधुनिक शिक्षण, उद्योग प्रशिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून हा करार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.


13
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!