*रेणुका नगर व मुल्ला वस्तीतील पाणीपुरवठा पुन्हा कमी दाबाने; जनसेवक योगेश भैय्या महाडीक यांची प्रशासनाकडे तक्रार*
बारामती, प्रतिनिधी
बारामती नगरपालिका हद्दीतील रेणुका नगर व मुल्ला वस्ती परिसरात पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात जनसेवक श्री. योगेश भैय्या महाडीक यांच्याकडे वारंवार तक्रारी येत असून, त्यांनी प्रशासनाकडे पुन्हा एकदा या गंभीर प्रश्नाची तक्रार नोंदवली आहे.
काही दिवसांपूर्वीही या परिसरातील नागरिकांनी कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी योगेश महाडीक यांनी प्रशासनास जाब विचारत, तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या भूमिकेनंतर प्रशासनाने काही दिवस चांगल्या दाबाने व नियमित पाणीपुरवठा केला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, पुन्हा एकदा पाणीपुरवठा कमी दाबाने होऊ लागल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. विशेष म्हणजे सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, पहिल्याच रोजाच्या दिवशी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर जनसेवक योगेश भैय्या महाडीक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करत, लवकरात लवकर संबंधित नेत्यांची व प्रशासनाची भेट घेऊन हा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले,
अन्यथा प्रश्न मार्गी नाही लागला तर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार असून, प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जनसेवक श्री योगेश भैय्या महाडिक यांच्याकडून केली गेली आहे.









