(ता.१५) संपादक – अनिकेत कांबळे
बारामतीमध्ये पोलिसांनी अमृता लॉजवर मोठा छापा टाकला. त्यात त्यांना विविध खोल्यांमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या, लॉजच्या आड देहव्यवसायाचा प्रकार उघडकीस आला आहे.
बारामतीत एक मोठा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शहराच्या बाहेरील वंजारवाडी परिसरातील अमृता लॉजवर लॉजच्या आड सुरू असलेला देहव्यवसायाचा अड्डा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास उद्ध्वस्त केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत बोगस ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला आणि अचानक छापा टाकत संपूर्ण रॅकेट उघडकीस आणलं.
खोल्यांमध्ये संशयास्पद हालचाली
छाप्यादरम्यान लॉजमधील विविध खोल्यांमध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्या. तपासात समोर आलं की आरोपी बाहेरून महिलांना आणून ग्राहकांना पुरवत होते आणि त्यातून आर्थिक फायदा मिळवत होते. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन जणांना अटक केली, तर पाच महिलांची सुटका करण्यात आली. कारवाईदरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन आणि ग्राहकांची नोंद असलेली वही असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.
अमृता लॉजवर धाड
काल मंगळवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक राम हरी भोसले यांच्या पथकाने बोगस ग्राहकाच्या मदतीने मोठा सापळा रचला. पंचांना सोबत घेऊन नियोजनपूर्वक अमृता लॉजवर धाड टाकण्यात आली. छाप्यादरम्यान लॉजमधील विविध खोल्यांची तपासणी करण्यात आली असता काही ठिकाणी महिला व ग्राहक एकत्र आढळून आले.
चौकशीदरम्यान संबंधित आरोपी हे बाहेरून महिलांना आणून त्यांना ग्राहकांना पुरवत असल्याचं उघड झालं. ग्राहकांकडून पैशांची वसुली करून त्यातून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असल्याचंही समोर आलं. या प्रकरणात अजित जयसीन शेट्टी (वय ३८, हॉटेल चालक) व चाँद कलाम आलम (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेत सापडलेल्या पश्चिम बंगाल येथील तीन आणि मुंबईमधील भिवंडी येथील दोन ,अशा पाच महिलांची सुटका करण्यात आली. त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आलं. आरोपी दोघांनी संगनमत करून महिलांना पैशांचं आमिष दाखवत देहव्यवसाय चालवल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.








