अजितदादांच्या निधनाच्या दुःखा मुळे, नटराज नाट्य कला मंडळाचा बारामती गणेश फेस्टिव्हल रद्द..!


फक्त गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार..!

संपादक – अनिकेत कांबळे 

बारामती (दि:२४): बारामतीकरांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवाचे आकर्षण ठरलेला बारामती गणेश फेस्टिव्हल यंदा आयोजित न करण्याचा निर्णय नटराज नाट्य कला मंडळाने घेतला आहे. फेस्टिव्हलचे संस्थापक तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते किरणदादा गुजर यांनी दिली.

 

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात बारामती गणेश फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. बारामतीसह परिसरातील नागरिकांसाठी हा फेस्टिव्हल गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरला आहे.

दरवर्षी फेस्टिव्हलचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते होत असे. अजितदादांचा या फेस्टिव्हलशी विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि पुढाकारातून फेस्टिव्हलने बारामतीच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले.

 

मात्र, यावर्षी अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर नटराज नाट्य कला मंडळाने उत्सवी स्वरूपातील गणेश फेस्टिव्हल न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादांच्या स्मृती आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती असलेल्या आदरातून संस्थेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

 

यंदा फेस्टिव्हलचे सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जाणार नसले तरी गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. धार्मिक परंपरा कायम ठेवत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. अजितदादांच्या निधनामुळे बारामतीच्या सार्वजनिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून यंदाचा गणेश फेस्टिव्हल स्थगित करण्याचा नटराज नाट्य कला मंडळाचा निर्णय भावनिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


18
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!