म्हसोबा मंदिरातील चांदीचा घोडा व पादुकांची चोरी उघडकीस. बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई..!


पिशवीत चांदीच्या वस्तू घेऊन फिरणाऱ्या संशयितांपासून सुरू झालेला तपास थेट चोरट्यांपर्यंत.

संपादक – अनिकेत कांबळे 

बारामती: (दि.०३) शहरातील तांदुळवाडी रोड, कल्पनानगर परिसरातील म्हसोबा मंदिराचे कुलूप तोडून चोरीस गेलेला चांदीचा घोडा आणि चांदीच्या पादुकांचा जोड बारामती शहर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे हस्तगत केला आहे. विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, गोपनीय बातमीदारांची माहिती आणि संशयितांकडे केलेली कसून चौकशी यामुळे या मंदिर चोरीचा छडा लागला.

 

दिनांक ५ जुलै २०२६ रोजी रात्री ते ६ जुलै २०२६ रोजी सकाळच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कल्पनानगर येथील म्हसोबा मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील चांदीचा घोडा व पादुकांचा जोड चोरून नेला होता. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गुन्ह्याचे धार्मिक स्थळाशी असलेले गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासण्यात आले. त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले.

 

तपास सुरू असतानाच दोन संशयित युवक एका पिशवीमध्ये चांदीच्या वस्तू घेऊन त्या विक्री करण्याच्या उद्देशाने बारामती परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. तपास पथकाने क्षणाचाही विलंब न करता संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू केली.

 

सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संशयितांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सदर चांदीच्या वस्तू इतर तीन जणांनी विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आणखी तीन जणांचा शोध घेऊन सर्व पाच जणांची एकत्रित व स्वतंत्रपणे कसून चौकशी केली.

 

चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने म्हसोबा मंदिरातील चांदीचा घोडा व पादुकांचा जोड चोरून आणला आणि तो इतरांच्या मदतीने विक्री करण्यासाठी दिल्याचे निष्पन्न झाले. विधीसंघर्षग्रस्त बालकाची ओळख कायदेशीर तरतुदींनुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे.

 

या प्रकरणात पोलिसांनी पुढील व्यक्तींना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे—

1. आदित्य विलास बगाडे, वय २१ वर्षे, रा. प्रगतीनगर, बारामती.

2. अथर्व विलास बगाडे, वय १९ वर्षे, रा. प्रगतीनगर, बारामती.

3. अथर्व राजेंद्र ननावरे, वय १९ वर्षे, रा. माऊलीनगर, तांदुळवाडी रोड, बारामती.

4. कुंदन सुनील काजळे, वय २५ वर्षे, रा. कल्याणीनगर, तांदुळवाडी, बारामती.

5. एक विधीसंघर्षग्रस्त बालक.

 

संशयितांकडून मिळालेल्या चांदीच्या वस्तू फिर्यादीस दाखविण्यात आल्या. फिर्यादीने त्या म्हसोबा मंदिरातून चोरीस गेलेल्या चांदीच्या पादुका व घोडा असल्याची खात्रीपूर्वक ओळख पटविली. त्यानंतर सोनाराकडून चांदीच्या वस्तूंचे वजन व शुद्धतेची तपासणी करून कायदेशीर पंचनाम्याने मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

चोरी झाल्यानंतर आरोपींनी मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला; मात्र चांदीच्या वस्तूंची पिशवी घेऊन फिरणे त्यांच्यासाठी घातक ठरले. गोपनीय माहितीचा अचूक वापर, सीसीटीव्ही फुटेजचे सूक्ष्म विश्लेषण आणि संशयितांच्या जबाबातील विसंगती शोधून काढत बारामती शहर पोलिसांनी या चोरीचा पर्दाफाश केला.

 

सदर गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, चोरीपूर्वी रेकी करण्यात आली होती का, चोरीचा माल कोणाला विक्री करण्यात येणार होता तसेच आरोपींचा अन्य गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

*कारवाई करणारे तपास पथक*

तपासी अंमलदार तथा पोलीस हवालदार यशवंत पवार, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस हवालदार अभिजीत कांबळे, पोलीस शिपाई पोपट कवितके, अक्षय सिताफ, गिरीश नेवसे, दत्ता मदने, तानाजी गोरे, ऋषिकेश जाधव, सागर जामदार आणि विशाल शिंदे यांनी विविध सीसीटीव्ही कॅमेरे, तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने गुन्ह्याची यशस्वी उकल केली.

 

“चोरी कितीही नियोजनबद्ध असली, तरी पुराव्यांची साखळी आणि पोलिसांची सतर्क नजर आरोपींपर्यंत पोहोचतेच,” हे बारामती शहर पोलिसांनी या कारवाईतून पुन्हा सिद्ध केले आहे.


16
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!