आरोपी तरुणाने तरुणीच्या गाडीची चावी हिसकावून घेतली आणि तिला तिच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्या घरी घेऊन गेला. तसंच घरी नेऊन तरुणीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही दिली.
बारामती (दि.१७)
बारामती शहरातील देशमुख चौक परिसरात तरुणीचा रस्ता अडवून तिला जबरदस्तीने घरी नेऊन मारहाण व लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपीची रवानगी येरवडा कारागृह येथे करण्यात आली आहे. ही घटना १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती येथील देशमुख चौक परिसरात तरुणीचा रस्ता अडवून आरोपी ओंकार अशोक जाधव (रा. हरिकृपानगर, बारामती) याने तिची दुचाकी जबरदस्तीने थांबवली. तिच्या वाहनाची चावी हिसकावून घेत तिला इच्छेविरुद्ध स्वतःच्या घरी घेऊन गेला. तेथे तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी मंजूर केली होती. पुढील सुनावणीत न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली आहे. सदरची कारवाई पोलीस हवालदार उदय टापरे, पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड ,बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, गुन्हेगार कोणताही असो, त्याला कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा भोगावीच लागेल. बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत कायद्याची जरब कायम असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा त्रास, छळ किंवा गुन्हा झाल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.









