सचिन सातव यांची बारामतीतील बाजाराला भेट; शेतकरी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद
बारामती : प्रतिनिधी
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांनी आज बारामती शहरानजीकच्या जळोची येथील जनावरांच्या बाजाराला भेट देत शेतकरी, व्यापारी आणि विक्रेत्यांशी संवाद साधला. बारामतीच्या विकासाला अधिकची गती देण्यासाठी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
बारामती शहरानजीक जळोची येथील भाजी मंडई आणि जनावरांचा बाजारात आसपासच्या जिल्ह्यातील अनेक शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने येत असतात. त्याचबरोबर स्थानिक व्यापारी आणि शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. या पार्श्वभूमीवर सचिन सातव यांनी जळोची येथील जनावरांच्या बाजारातील समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. या ठिकाणी असलेल्या सुविधा, वाहतूक, पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सुधारणा याबाबतही यावेळी चर्चा झाली.









