बारामती: दि.30
आरोपीने वेळोवेळी पाठलाग करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकावर विधवा महिलेचा छळ, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. बारामती तालुका पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती नगर परिषदेतील किशोर मासाळ या नगरसेवकाविरुद्ध लैंगिक छळ, धमकी, मारहाण आणि पाठलाग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका ४५ वर्षीय विधवा महिलेच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती निधन पावल्यानंतर आरोपीने तिच्या ओळखीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. फेब्रुवारी ते मे २०२६ या कालावधीत आरोपीने महिलेच्या राहत्या घरी अनधिकृतपणे प्रवेश करून वारंवार शरीरसुखाची मागणी केली. तसेच अंगाला स्पर्श करून आणि मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने स्वतःच्या राजकीय ओळखीचा धाक दाखवत तिला धमकावले. ‘मी पुढारी आहे, तुला सुखाने जगू देणार नाही, खोट्या गुन्ह्यात अडकवीन,’ असे सांगून दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
याशिवाय, बारामतीतील काही उद्योजकांकडून पैसे उकळून आणण्याची मागणी केल्याचा आरोपही पीडित महिलेकडून करण्यात आला आहे. मागणीला प्रतिसाद न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. आरोपीने वेळोवेळी पाठलाग करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बारामती नगरपालिकेत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या विद्यमान नगरसेवकावर महिलेने गंभीर आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस तपासात नेमकं काय निष्पण्ण होतं आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाकडून किशोर मासाळ यांच्यार काही कारवाई केली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.








