बारामतीत तापमान ४१ अंशांवर; दुपारी १२ ते ४ बाहेर पडणे टाळावे..


बारामती शहर होरपळला! पारा ४१ अंशांवर; दुपारी १२ ते ४ बाहेर पडू नका!

 

बारामती (ता.१७) शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढतच आहे. बुधवारी (१५) यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४१, अंश सेल्शियसची नोंद झाली आहे. यात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असल्याने शहरवासीयांनी काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.

वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम झाल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.शहरात सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवत होता. दुपारच्या सुमारास उष्णतेची तीव्रता अधिक वाढल्याने रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाली. बाहेर पडणारे नागरिक टोपी, स्कार्फ, सनकोट तसेच गॉगलचा वापर करून उन्हापासून बचाव करत असल्याचे दिसून आले.

उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी शहरातील रसवंतीगृह, थंड पेयांची दुकाने आणि आईस्क्रीम पार्लर्स येथे नागरिकांची गर्दी वाढली होती. दुसरीकडे वातानुकूलन यंत्रे, कूलर आणि पंख्यांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तहान नसेल तरीही नागरिकांनो, पाणी प्या

आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी, ताक आणि कैरीचे पन्हे यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करा, बाहेर पडताना हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावे. डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कापडाचा वापर करावा. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. पाळीव प्राणी आणि गुरांना सावलीत ठेवा, त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्या, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

पक्ष्यांसाठी पिण्याचे भांडे

पक्षी, खार अशा मुक्या जनावरांसाठी काही स्वयंसेवी संस्थांकडून पाण्याचे भांडे वाटप करण्यात आले आहेत. तर गाय, भटके श्वानांसाठीदेखील शहरात पाण्याचे भांडी ठेवण्यात आली आहेत.

डॉक्टरांना भेटा

चक्कर येणे, सतत घाम येणे, डोकेदुखी किवा अशक्तपणा जाणवल्यास ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


12
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!