लोन क्लोजच्या आमिषाने फसवणूक करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात!
बारामती प्रतिनिधी |
लोन कमी करून देतो, असे सांगत नागरिकांची फसवणूक करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या तावडीत आला आहे. बारामती शहर पोलिसांनी काटेवाडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील रविंद्र भिमराव डोंबाळे आणि त्याची पत्नी यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२३ साली आरोपीने ‘विराज फायनान्स’ नावाची फर्म सुरू करून लोन क्लोज करून देतो अशी बतावणी करत विविध घटकातील लोकांकडून पैसे घेतले. मात्र, प्रत्यक्षात लोन क्लोज न करता या रकमेचा अपहार करून अनेकांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी २०२३ मध्येच बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रविंद्र डोंबाळे सतत पोलिसांना चकवा देत फरारी होता.
मात्र, बारामती शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हा प्रकटीकरण पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. आरोपीकडून पुढील तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.या यशस्वी कारवाईसाठी पोलिस अधीक्षक संदिपसिंग गिल (पुणे ग्रामीण), अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या पथकात पोलिस उपनिरीक्षक सतिष राऊत, पोलिस अंमलदार अमीर शेख, अभिजित कांबळे, दत्तात्रय मदने, अक्षय सिताप आणि गिरीष नेवसे यांनी मोलाची भूमिका बजावली.









