बायकोला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, कोट्यवधींची फसवणूक करणारा सिनेस्टाईल जेरबंद..!


बारामती (दि.२७)                                      संपादक- अनिकेत कांबळे   

सरकारी नोकरीचं खोटं नियुक्तीपत्र देवून कोट्यवधी रुपये बळकावणाऱ्या आरोपीला बारामती पोलिसांनी सिनेस्टाईल जेरबंद केलं आहे. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता.

शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींसह अनेकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी 36 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी नोकरीचे आमिष देऊन कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या आरोपीला अखेर बारामती पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या आरोपीने सरकारी नोकरीचे आमिष देऊन एक कोटींपेक्षा जास्त रुपये उकळले होते. आरोपीने खोटे नियुक्तीपत्र देखील दिले होते. तसेच पैस घेऊन आरोपी फरार झाला होता. आरोपी अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. पोलीस आरोपीचा शोध घेत होते. पण तो पोलिसांच्या हातून निसटत होता. अखेर पोलिसांना आरोपीबद्दल खात्रीलायक माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीला जेरबंद केलं.

२०२३ ते ४ मे २०२५ या कालावधीत तांदुळवाडी येथील महिला रुग्णालय आणि मळद परिसरात ही फसवणूक सुरू होती. मुख्य आरोपी अनिकेत धनंजय पाठक याने ‘गट-क अधिपरिचारिका’ पदावर सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत महिला रुग्णालयातील स्टाफ नर्स तसेच इतर इच्छुकांशी संपर्क साधला. त्यानंतर अजिंक्य पाठक, सिओना साळवे उर्फ सिओना अनिकेत पाठक, सुधाकर सोळंकी, सागर गायकवाड आणि सुरज असदकर यांच्या मदतीने फिर्यादी आणि इतरांकडून वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात मोठी रक्कम उकळली.

 

विश्वास बसावा यासाठी आरोपींकडून बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोकरी मिळाली नसल्याचे समोर आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मार्च २०२६ मध्ये बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, फरार आरोपी सुरज तिमयया असदकर हा चिंचवडगाव येथे पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याच माहितीच्या आधारे सापळा रचला. अखेर आरोपी खरंच तिथे आला. यावेळी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला अटक केली. चौकशीत आरोपीने आर्थिक लाभासाठी संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आधीच अजिंक्य पाठक (दौंड) आणि सुधाकर सोळंकी (येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे.

 

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांच्यासह पोलीस अंमलदार सागर देशमाने, जितेंद्र शिंदे, विठ्ठल तरंगे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.


12
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!