बारामतीत PSEA BRCचा इंजिनिअर्स डे उत्साहात; ११० हून अधिक अभियंत्यांचा सहभाग.


बारामती (प्रतिनिधी):* भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त ‘प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन – बारामती रिजन सेंटर’ (PSEA BRC) आणि ‘अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथील हॉटेल कृष्णासागर येथे इंजिनिअर्स डे सोहळा व तांत्रिक चर्चासत्र उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, फलटण, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड या सात तालुक्यांमधील ११० हून अधिक स्ट्रक्चरल इंजिनिअर्स,सिव्हिल इंजिनिर्स,वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि तांत्रिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बारामती चे भाग्यविधाते स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर इंजि. विकास निर्मळ लिखित व संकल्पित ‘बारामतीचा विठ्ठल’ हा विशेष श्राव्य-दृश्य माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. महाराष्ट्राच्या व बारामतीच्या विकासप्रवासातील विविध पैलू आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीशी संबंधित आठवणी मांडणाऱ्या या सादरीकरणानंतर उपस्थितांची मन दादांच्या आठवणींनी हेलावली .

 

या प्रसंगी PSEA चे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. शेषराव कदम आणि राष्ट्रीय सचिव इंजि. अजय कदम यांनी उपस्थित अभियंत्यांना इंजिनिअर्स डेच्या शुभेच्छा देत अभियंत्यांची सामाजिक व व्यावसायिक जबाबदारी, स्ट्रक्चरल सेफ्टी, बांधकामातील गुणवत्ता, व्यावसायिक शिस्त आणि तांत्रिक ज्ञानाचे सातत्याने अद्ययावतीकरण याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थित अभियंते आणि तज्ज्ञांमध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या विविध विषयांवर उत्स्फूर्त संवाद झाला.

कार्यक्रमातील प्रमुख तांत्रिक सत्रात डॉ. समाधान जी. मोरखडे, असोसिएट प्रोफेसर, VPKBIET, बारामती यांनी ‘Earthquake Analysis and Design of Structures’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. भूकंपप्रवण परिस्थितीत इमारतींचे विश्लेषण व डिझाईन, स्ट्रक्चरल बिहेवियर, डक्टाइल डिटेलिंग, RCC स्ट्रक्चर्समधील आवश्यक काळजी तसेच संबंधित भारतीय मानकांनुसार डिझाईन व बांधकाम करताना घ्यावयाच्या तांत्रिक बाबींवर त्यांनी माहिती दिली. सादरीकरणानंतर उपस्थित अभियंत्यांनी प्रत्यक्ष डिझाईन व साइटवरील अडचणींशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले.

 

त्यानंतर झालेल्या तांत्रिक चर्चेत IS Codes, RCC डिझाईन, भूकंपरोधक बांधकाम, डक्टाइल डिटेलिंग, काँक्रीट गुणवत्ता, साइट एक्झिक्युशन आणि स्ट्रक्चरल सेफ्टी यांसारख्या विषयांवर सविस्तर विचारविनिमय झाला. प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रातील अनुभव आणि तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण झाल्याने हे चर्चासत्र उपस्थित अभियंत्यांसाठी उपयुक्त ठरले.

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. इंजि. सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद यांनी उपस्थितांना संबोधित करताना बारामती शहराच्या नियोजनबद्ध आणि सुरक्षित विकासासाठी तांत्रिक क्षेत्रातील व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले. नगरपालिका, स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, वास्तुविशारद, डेव्हलपर्स आणि बांधकाम क्षेत्रातील घटक यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. शहराच्या विकासकामांसाठी तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्य आणि संवाद वाढविण्याच्या दृष्टीने ‘Line of Action’ बाबतही त्यांनी आपले विचार मांडले.

 

या कार्यक्रमास नगरसेवक इंजि. अमोल कावळे तसेच Builders Association of India (BAI) आणि CREDAI Baramati Center यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. PSEA BRCच्या माध्यमातून बारामतीसह कार्यक्षेत्रातील सातही तालुक्यांमधील स्ट्रक्चरल इंजिनिअर्सना एकत्र आणून तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक समन्वय आणि बांधकाम क्षेत्रातील सुरक्षितता व गुणवत्तेबाबत जनजागृती वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत PSEA BRCचे अध्यक्ष इंजि. दिलीप यादव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संपूर्ण सत्राचे संयोजन सल्लागार इंजि. विकास निर्मळ यांनी अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत केले. उपस्थितांचे आणि कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था व मान्यवरांचे आभार सचिव इंजि. सूरज चांदगुडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी खजिनदार इंजि. गौरव जाधव तसेच PSEA BRCच्या कार्यकारिणी सदस्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

 

PSEA BRCच्या वतीने आयोजित या इंजिनिअर्स डे सोहळ्यामुळे अभियंत्यांना एकत्र येऊन तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण करण्याबरोबरच स्ट्रक्चरल सेफ्टी, गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि व्यावसायिक जबाबदारी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी PSEA BRCच्या सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सहकारी अभियंते आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांचे विशेष सहकार्य लाभले.


18
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!