पोलिस निरीक्षक नारायण पवार ॲक्शन मोडवर; रोड रोमिओ, साखळीचोर आणि टवाळखोरांच्या मुसक्या आवळणार..!


संपादक – अनिकेत कांबळे 

बारामती: (दि.१४) :शहरातील महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तसेच शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे रोखण्याच्या उद्देशाने बारामती तालुका पोलिसांकडून विशेष पायी गस्त (फूट पेट्रोलिंग) मोहीम राबविण्यात आली. संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा, शैक्षणिक परिसर, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी पायी फिरून नागरिकांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला.

 

शहरात काही ठिकाणी रोड रोमिओंकडून महिलांची व मुलींची छेडछाड होण्याच्या तक्रारी, साखळीचोरीच्या घटना तसेच इतर गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात आली. महिलांना सार्वजनिक ठिकाणी निर्भयपणे व सुरक्षितपणे वावरता यावे, यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी विशेष लक्ष ठेवले. शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, सार्वजनिक बागा आणि बाजारपेठांमध्ये संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यात आली.

 

यावेळी पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचाही आढावा घेतला. मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग, रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारे अडथळे तसेच अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

पायी गस्तीदरम्यान पोलिसांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला. संशयास्पद व्यक्ती, संशयास्पद हालचाली किंवा कोणतीही अनुचित घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले.

 

बारामती पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, सार्वजनिक ठिकाणी उनाडगिरी, भाईगिरी, बेशिस्तपणा, महिलांची छेडछाड, दहशत निर्माण करण्याचे प्रकार किंवा कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. अशा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कारवाईचाही अवलंब केला जाणार आहे.

 

शहरात सुरक्षित आणि गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी बारामती पोलिसांकडून अशा प्रकारच्या पायी गस्त मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. महिलांच्या सुरक्षिततेसह नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असून, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

या विशेष मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असून, पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलिस प्रशासन सातत्याने दक्ष असून, गुन्हेगारीविरोधातील ही मोहीम आगामी काळातही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहे.


13
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!