जीम आणि झुंबा क्लासवर कारवाई न करण्यासाठी 5 लाख मागितले, पैसे स्वीकारताना पोलीस हवालदार जाळ्यात.


बारामती दि.०९

बारामतीत जिम अन् झुंबा क्लासवर कारवाई न करण्यासाठी 5 लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार महेश उगले याला एसीबीने रंगेहाथ पकडले.

 

बारामतीमधून एक अत्यंत धक्कादायक आणि पोलीस प्रशासनाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. झुंबा डान्स क्लास आणि जिमच्या विरोधातील तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांची भरभक्कम लाच (Bribe) स्वीकारताना बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. एसीबीने जाळ्यात पकडलेल्या आरोपी पोलीस हवालदाराचे नाव महेश उगले असे आहे. तो बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत होता.

 

ही धडक कारवाई मंगळवारी (8 सप्टेंबर) बारामती शहरातील माळेगाव रोड परिसरात करण्यात आली असून, या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

तक्रारदार आणि त्यांच्या पत्नी बारामतीत संयुक्तपणे झुंबा डान्स क्लास (Zumba Dance Class) आणि जीमचा (Gym) व्यवसाय चालवतात. त्यांच्या या क्लासमुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याची एक तक्रार पोलीस ठाण्यात आली होती. याच तक्रारीचा धाक दाखवून हवालदार महेश उगले याने कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केली होती.

 

7 लाखांची मागणी; आधीच 2 लाख वसूल केले

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित झुंबा क्लास आणि जीमवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आरोपी पोलीस हवालदार महेश उगले याने सुरुवातीला तब्बल 7 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

 

या 7 लाख रुपयांपैकी 2 लाख रुपये तक्रारदाराने आरोपी हवालदाराला आधीच दिले होते. मात्र, उर्वरित 5 लाख रुपयांच्या रकमेसाठी हवालदार उगले याने तक्रारदाराकडे वारंवार तगादा लावला होता.

 

5 लाख घेताना एसीबीने आवळल्या मुसक्या

वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने थेट पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB Pune) याबाबत अधिकृत तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची अत्यंत गुप्तपणे पडताळणी केली असता, हवालदार महेश उगले याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

 

त्यानंतर एसीबीच्या पथकाने बारामतीतील माळेगाव रोड परिसरातील पी.डी.सी.सी. (PDCC) बँकेच्या जवळ सापळा रचला. हवालदार महेश उगले याने तक्रारदाराकडून उर्वरित 5 लाख रुपयांची रोख रक्कम जशी हातात घेतली, तसे दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी आरोपी हवालदारावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


18
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!